GM Report June 2026 Hero Image

सभेचा वृत्तांत, जून - २०२६


📢 सभेची नोटीस

प्रति,

सर्व सभासद,
सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. भूखंड क्र.५२,
सेक्टर-१५,
वाशी,
नवी मुंबई ४००७०३.

विषय : संस्थेच्या इमारतीच्या प्रस्तावित पुनर्विकास / पुनर्बाधणी (Redevelopment) कामाकरिता प्राप्त विकासकांच्या निविदा (Developer Tender) उघडण्याबाबत सर्वसाधारण सभा.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960, त्याअंतर्गत नियम, शासन निर्देश व संस्थेच्या उपविधींच्या तरतुदीनुसार संस्थेच्या इमारतीच्या प्रस्तावित पुनर्विकास / पुनर्बाधणीसाठी विकासक / निविदादार यांच्याकडून निविदा / ऑफर मागविण्यासाठी संस्थेमार्फत विविध वर्तमानपत्रांमध्ये निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तसेच, दि. ३१/०५/२०२६ रोजी झालेल्या कार्यकारीणीच्या सभेत उपस्थित असलेल्या सभासदांनी केलेल्या मागणी व संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार, तसेच दि.०३/०५/२०२६ रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाप्रमाणे प्राप्त झालेल्या सीलबंद निविदा / ऑफर उघडण्यासाठी संस्थेची सर्वसाधारण सभा दिनांक ०७/०६/२०२६ रोजी वेळ संध्याकाळी ५.०० वा. सोसायटी आवारात आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यात येणार आहे.

सभेचा विषयक्रम :-

  1. अध्यक्षाची निवड करणे.

  2. विकासक / निविदादार यांच्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या सीलबंद निविदा / ऑफर सभेमध्ये उघडणे.

  3. प्राप्त निविदांचे परीक्षण, छानेनी व तुलनात्मक तक्ता तयार करण्यासाठी व्यवस्थापन समिती /प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) यांना अधिकार प्रदान करणे.

  4. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारा इतर विषय.

सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, ही विनंती.

सचिव / अध्यक्ष

सूचना :

  1. फक्त मूळ सभासदांनाच सभेस उपस्थित राहण्याचा व मतदानाचा अधिकार राहील.

  2. सहयोगी सभासदांना उपविधीनुसार आवश्यक अधिकार असल्यास सभेस उपस्थित राहता येईल.

  3. सभासदांना प्रॉक्सीने मतदान करता येणार नाही.

  4. सभेस उपस्थित राहताना ओळखपत्र सोबत आणावे.


End of Notice

📝 सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त

सर्वसाधारण सभेची नोटीस दि.३१.०५.२०२६ मधील नमूद केल्याप्रमाणे तसेच दि.३१.०५.२०२६ रोजी झालेल्या कार्यकारीणीच्या सभेत उपस्थित असलेल्या सभासदांनी केलेल्या मागणी व समंत करण्यात आलेल्या ठरावानुसार तसेच दि.०३.०५.२०२६ रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाप्रमाणे प्राप्त झालेल्या सिलबंद निविदा । ऑफर उपडण्यासाठी सिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण को. ऑप. हौ. सोसायटी बी १०/ बिल्डींग नं. १ ते ९, भूखंड क्र.५२, सेक्टर १५, वाशी नवी मुंबई ४०० ७०३ ची सर्वसाधारण सभा दि.०७.०६.२०२६ रोजी सोसायटी आवारात सायंकाळी ५ : ०० वाजता आयोजित करण्यात आली. सोसायटीचे सचिव श्री. राहूल वाघमारे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करुन सभेची सुरवात केली.

विषय क्र.१ : सभेसाठी अध्यक्षांची निवड करणे.

चर्चा: सदर विषयावर चर्चा करताना सचिव श्री राहुल वाघमारे यांनी सांगितले की सभेकरिता अध्यक्ष नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याकरिता श्री सचिन दळवी यांनी आजच्या सभेचे अध्यक्ष स्थान भुषवावे अशी विनंती केली. त्यास श्री विलास तोरस्कर यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे श्री सचिन दळवी यांची सभेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

ठराव क्र.१ : ठराव करण्यात येत आहे कि, श्री सचिन दळवी यांना आजच्या सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे.

सुचक : श्री राहूल वाघमारे

अनुमोदन : श्री विलास तोरस्कर

ठराव मंजूर.

ठराव क्र.१ नुसार श्री सचिन दळवी यांनी सभेचे अध्यक्ष स्थान स्विकारल्या नंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज विषय पत्रिकेनुसार सचिव श्री राहूल वाघमारे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सुरु केले. त्यानुसार सर्वप्रथम सोसायटीतील सभासदांच्या दिवगंत नातेवाईकांना सोसायटीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

विषय क्र.२ : विकासक / निविदादार यांच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सिलबंद निविदा । ऑफर सभे मध्ये उघडणे.

चर्चा: सदर विषयासंदर्भात सभेसमोर बोलताना श्री राहूल वाघमारे यांनी सभेस माहिती दिली कि, आपण दिनांक ३१.०५.२०२६ रोजी झालेल्या कार्यकारीणीच्या सभेत उपस्थित असलेल्या सभासदांच्या मागणी आणि संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार प्राप्त सिलबंद निविदा / ऑफर उघडण्याच्या प्रक्रियेला सुरवात करुया.

त्यावर श्री विश्वनाथ सावंत व श्री सुनिल गुप्ता यांनी सभेमध्ये उभे राहून काही मुददे आणि सुचना आणलेल्या पत्राद्वारे मांडायचे आहेत असे सांगितले. परंतू आपण आधी ज्या विषयावर हि सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे तो विषय घेऊ आणि त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने तुम्ही तुमचे मत मांडावे तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला जाईल असे वारंवार सचिव श्री राहूल वाघमारे यांनी सांगून सुध्दा श्री विश्वनाथ सावंत यांनी सचिव यांच्या सुचना न जुमानता आपले विषय मांडण्यास सुरवात केली. तसेच अध्यक्ष्य श्री सचिन दळवी यांनी सुध्दा आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला जाईल परंतू श्री विश्वनाथ सावंत यांनी त्यांनी केलेल्या पत्रव्यवहार एक एक करुन वाचण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या दिनांक ३०.०५.२०२६ च्या पत्रानुसार मालमत्ता पत्रकानुसार सदरचा भुखंड क्र.५२ हा आजमितीस बी-१० टाईप अपार्टमेंट असोसिएशन यांच्या नावे असल्याचे दिसून येते आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जोपर्यंत संस्थेच्या नावे जमिनीचा मालकीहक्क हस्तांतरीत होत नाहित तोपर्यंत संस्थेचा पुनर्विकास करता येत नाही. त्यावर उत्तर देत असोसिएशन मधून को.ऑप. हौ. सोसायटी मधील प्रक्रिया करताना सिडकोने दिलेली ना हरकत (NOC) परवानगी पत्र आणि सिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण को. ऑप. हौ. सोसायटी मर्यादित, भूखंड क्र.५२, सेक्टर १५, वाशी नवी मुंबई ४००७०३ या नावे असलेले नोंदणी प्रमाणपत्र (RAGISTRETION CERTIFICATE) आपल्याकडे आहे असे सचिव श्री. राहूल वाघमारे यांनी सांगितले. त्याच संदर्भात पुढे कायदेशिर तज्ञ (LEGAL ADVISOR) श्री अभिनव सिंग यांनी आपण केलेली प्रक्रिया योग्य आहे आणि आज हयाच प्रक्रियेने नवी मुंबईत प्रक्रल्प यशस्वी होत आहेत असा खुलासा करत आपल्या सोसायटीचे सर्व दस्ताऐवज (DOCUMENT) पूर्ण आहेत असे सांगितले.

तसेच श्री सुनिल गुप्ता यांनी मी दिनांक १०.०४.२०२६ रोजी दिलेल्या निविदा सुचना बदद्ल मला मिटिंग मध्ये बोलावण्यात आले नाही. परंतू सदर मिटिंग ही दिनांक ०९.०४.२०२६ रोजी झालेली होती आणि येणा-या दिनांक १२.०४.२०२६ च्या विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा करता येईल असे स्पष्टीकरण सचिव श्री राहूल वाघमारे यांनी दिले. तसेच मला व्हिडियो रेकॉर्डिंग (VIDEO RECORDING) पेन ड्राईव्ह मध्ये देण्यात यावे असे विचारणा केली असता सदर प्रश्नांची उत्तरे दि. १.०६.२०२६ च्या पत्राद्वारे देण्यात आलेली आहेत, असे अध्यक्ष श्री सचिन दळवी यांनी तुम्ही सोसायटी कार्यालयात पूर्व सूचना देऊन सदर व्हिडीओ रेकॉर्डिंग वघू शकता असे स्पष्टीकरण दिले. सदर बाबतीत कायदेशीर सल्लागार श्री अभिनव सिंग यांनी सदरची माहिती कुठल्या कारणासाठी आहे हे नमूद करुन त्यांना पाहिजे असलेल्या मुद्दयांची व्हिडियो रेकॉर्डिंग (VIDEO RECORDING) पेन ड्राईव्ह मध्ये देण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

तसेच श्री सुनिल गुप्ता यांनी आपल्या वाजूच्या ओमकार सोसायटीने निविदा देण्यासाठी (TENDER DOCUMENT) रु. ५०००/- प्रत्येकी विकासक / निविदादार यांस कडून घेतले त्यावर सचिव श्री राहुल वाघमारे यांनी सांगितले की, आपण तसे न करता निविदा विनामूल्य दिल्या कारण जर प्रत्येक निविदादार कडून पैसे घेतले तर कोणीही प्रतिनिधी / एजंट (AGENT) येऊन पैसे देऊन निविदा मागणी करु शकेल आणि अश्याने हया प्रक्रियेत पारदर्शकता राहणार नाही आणि पारदर्शकता / अचूकतेला कुठेतरी बाधा निर्माण झाली असती, असे स्पष्टीकरण दिले. श्री विश्वनाथ सावंत यांनी आम्ही केलेल्या पत्रव्यवहारावे उत्तर दयावे असे विचारले असता अध्यक्ष श्री सचिन दळवी यांनी आपल्याला सर्व पत्रांची उत्तरे सोसायटी तर्फे दिली जात आहेत असे सांगून त्यांनी केलेल्या दिनांक ०२.०५.२०२६ रोजीच्या पत्र व्यवहाराचे उत्तर सर्व सभासदांसमोर वाचून दाखविले.

अशा प्रकारे जवळजवळ दिड तास चर्चा झाल्यामुळे मूळ विषय तसाच राहून गेल्याने काही सभासदांनी आपण निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरु करावी असे सांगितले. कमिटीचे सदस्य श्री गणेश मोंडकर यांनी सभासदांना होणारा त्रास सांगितला तसेच श्रीमती पुष्पा पटेल काकी (B/१०/२/०:४) यांनी त्यांच्या घरी काही दिवसांपूर्वी पडलेल्या प्लॅस्टर बदल सांगून लवकरात लवकर आपण पुर्विकासाची प्रक्रिया करावी कारण आम्ही येथे राहत असून तसेच इमारती जुन्या असल्यामुळे धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगत असताना श्री पी.पी. म्हात्रे यांनी रागाच्या भरात त्यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सभेत गोधंळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी सर्व सभासदांनी त्यांच्या हया वागण्यावर आक्षेप नोंदविला यावर सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, व सदस्य सर्वश्री गणेश मोंडकर, प्रमोद पालांडे, विलास तोरस्कर, दिपक कोळी, सुहास बागल, शैलेश जाधव यांनी दखल घेत श्री पी.पी. म्हात्रे यांना शब्द मागे घेण्याचे सुचवून वाद शमविण्याचा प्रयत्न केला परंतू श्री पी.पी. म्हात्रे यांनी वापरलेले शब्द मागे न घेतल्याने सभेत गोंधळ निर्माण झाला. श्रीमती पुष्पा पटेल, श्रीमती आशा नाईक, श्रीमती शमा भोगटे, श्रीमती रूपाली राजदेव, श्री.विवेक येवले, श्री. गणेश पगारे, श्री.देवकर व इतर सभासदांनी होणारा त्रास व धोका सांगून सोसायटी कमिटीने लवकरात लवकर पुनर्विकासाची प्रक्रिया करावी अशी मागणी केली.

ठराव क्र.२ : श्री गणेश मोंडकर यांनी आपण बहुमताने निविदा पेटी उघडण्याची प्रक्रिया करुया असे सुचविले त्यास सर्वश्री विश्वनाथ सावंत, सुनिल गुप्ता, पी.पी. म्हात्रे, रविंद्र कुकडे, उत्तम पवार, श्रीमती गुप्ता हे सभासद वगळता उपस्थित असलेल्या वाकी सर्व सभासदांनी बहुमताने निविदा उघडण्याच्या प्रक्रियेला मंजूरी दिली आणि निविदा पेटी उघडण्याच्या प्रकियेला सुरवात झाली.

सर्व सभासदांसमोर निविदा पेटी ठेवण्यात आली. सचिव श्री राहूल वाघमारे यांनी सोसायटीतील ज्येष्ठ सभासद श्री सुधाकर पुजारी यांना निविदा पेटी उघडण्यास विनंती केली. निविदा पेटी उघडल्यानंतर एक एक सभासदांना बोलावून विकासक / निविदादार यांच्याकडून आलेली निविदा पेटीतून काढण्यात आली आणि कायदेशिर सल्लागार श्री अभिनव सिंग यांनी त्या आलेल्या निविदा दिलेल्या विकासकाचे नाव, त्यांनी दिलेल्या ऑफर्स यांची सर्व सभासदांसमोर माहिती देऊन सभासदांच्या स्वाक्षरी सहीत नोंद करण्यात आली.

विकासाकडून आलेल्या निविदा खालीलप्रमाणे :-

१. BHAGWATI HABITAT LLP

२. EV HOMES GROUP

३. PLATINUM GROUP

४. KAMDHENU BUILDER AND DEVELOPARS

५. AKSHAR BUSINESS PARK

६. BALAJÍ WORLD

७. SAYAJI REALTY PTV LTD

८. GAMI GROUP

९. SCARLETT LIFESTYLE LLP

१०. PARTH WORLD LLP

सुचक : श्री राहूल वाघमारे

अनुमोदन : बहुमताने मंजूर

ठराव बहुमताने मंजूर

विषय क्र. ३ : प्राप्त निविदांचे परिक्षण, छाननी व तुलनात्मक तक्ता तयार करण्यासाठी व्यवस्थापन समिती /प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) यांना अधिकार प्रदानकरणे.

चर्चा : विकासकाकडून आलेल्या निविदा उघडल्यानंतर आलेल्या निविदांचा परिक्षण, छाननी व तुलनात्मक तक्ता तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) यांना सुपुर्द करण्यात येईल असे सचिव श्री राहूल वाघमारे यांनी सर्व सभासदांना सांगितले. तसेच कायदेशिर सल्लागार श्री अभिनव सिंग यांनी हया प्रक्रियेस थोडा वेळ दयावा म्हणजे व्यवस्थित काम केले जाईल. श्री रविंद्र कुकडे यांनी आलेल्या निविदांवरती प्रत्येक प्रतीवर क्रमसातत्याने नंबरीक करावे असे सुचविले.

ठराव क्र. ३ : ठराव करण्यात येत आहे कि, आलेल्या निविदांची (प्रत प्रमाणे) सर्व उपस्थित सभासदांसमोर नोंद करुन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलट (PMC) सहकारी श्री. हरिश शिंदे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यात विकासकाकडून आलेल्या निविदांची (प्रत्येकी प्रतप्रमाणे) नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत सर्वश्री सचिन दळवी, राहूल वाघमारे, गणेश मोंडकर, सुधाकर पुजारी, सुहास बागल, विलास तोरस्कर, लक्ष्मण देवकर, विश्वनाथ सावंत, रविंद्र कुकडे, प्रकाश म्हात्रे, सुनिल गुप्ता, प्रभाकर तावडे, प्रमोद पालांडे, दिपक कोळी, शैलेश जाधव व इतर सभासद यांनी भाग घेतला.

सुचक : श्री राहूल वाघमारे अनुमोदन : बहुमताने मंजूर ठराव बहुमताने मंजूर

श्री शैलेश करगुटकर (B/१०/४/३:२) यांनी हि पुनर्विकासाची प्रक्रिया कधीपर्यंत होईल असे कायदेशिर सल्लागार श्री अभिनव सिंग यांना विचारले असता जर सर्व काही नियमाने आणि सुरळीत झाले तर सदरची प्रक्रिया हि ८ ते १० महिन्यात होईल, असे सांगण्यात आले. हया कालावधीत अंतर्गत दुरुस्ती उद्भवल्यास इमारतीच्या सरचनांत्मक भागास कोणतीही हानी होणार नाही याची काळजी दुरुस्ती करणा-या घरमालकांनी घ्यावी, तसेच स्ट्रकचर ऑडिट (STRUCTURAL AUDIT) करावे असे श्री शैलेश करगुटकर यांनी सुचविले. त्यावर अध्यक्ष श्री सचिन दळवी यांनी हा पुनर्विकासाचा भाग असल्याने या प्रक्रियेत करण्यात येईल असे सांगितले.

अश्या प्रकारे सर्व विषयावर चर्चा होऊन अध्यक्ष श्री सचिन दळवी यांनी सर्व उपस्थित सभासदांचे तसेच कायदेशिर सल्लागार श्री अभिनव सिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलट (PMC) यांस कडून आलेले सहकारी श्री. हरिश शिंदे यांचे आभार मानून आलेल्या सर्व निविदांची (प्रत प्रमाणे) सर्व उपस्थित सभासदांसमोर नोंद करुन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलट (PMC) यांचेकडे सुपुर्द करण्यात आले.