
सभेचा वृत्तांत, एप्रिल - २०२६
📢 सभेची नोटीस
प्रति,
सर्व सदस्य,
सिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. भूखंड क्र.५२,
सेक्टर-१५,
वाशी,
नवी मुंबई ४००७०३.
विषय : दि. १२.०४.२०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेबाबत (SGM)
सिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., भुखंड क्र. ५२, सेक्टर १५, वाशी, नवी मुंबई या सोसायटीच्या सभासद / सदनिकाधारक यांना सुचित करण्यात येते कि, आपल्या सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दि. १२.०४.२०२६ रोजी सांयकाळी ४.३० वा. आपल्या सोसायटीच्या आवारात, वाशी, नवी मुंबई येथे खालील विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासद / सदनिकाधारकांनी वेळेवर उपस्थित रहावे, हि विनंती.
सभेपुढील विषय :
१. सभेसाठी अध्यक्षांची निवड करणे,
२. मागील सभेचे दिनांक ०१.०२.२०२६ रोजीचे इतिवृत्त वाचन करुन मंजुरी देणे.
३. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंसलटंट (PMC) नियुक्ती नंतर त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावर चर्चा करुन निर्णय घेणे बाबत.
अ) प्रकल्य व्यवहार्यता अहवाल (Project Feasiblity Report)
ब) प्रस्तावित युनिट आराखडा (Proposed Unit Plan)
क) मसुदा निविदा दस्तवेज (Draft Tender Document)
४. मागील सभेत ठरल्याप्रमाणे निविदा मागवून सोसायटीला विमा (Insurance) काढणे बाबत निर्णय घेणे.
५. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करुन निर्णय घेणे.
सूचना :
१) गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी, अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल.
२) सभेस फक्त सभासद असलेले सदनिकाधारक उपस्थित राहू शकतील. सभासदा व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. येताना स्वतः चे ओळख पच आणणे जरुरीचे आहे.
End of Notice
📝 सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त
सिध्दीविनायक को.ऑप. हौसिंग सोसायटी, मर्या. भूखंड नं. ५२. बिल्डींग नं. १ ते ९, सेक्टर १५, वाशी, संस्थेची ची विशेष सर्वसाधारण सभा दि. १२.०४.२०२६ रोजी सोसायटीआवारात सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली. अपुऱ्या गणसंख्येअभावी सदर सभा अर्धा तासाकरिता तहकूब करून पुन्हा त्याच ठिकाणी सायं. ०५.०० वाजता सुरु करण्यात आली. सोसायटीचे सचिव श्री. राहुल वाघमारे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करून सभेची सुरुवात केली.
विषय क्र. १ - सभेसाठी अध्यक्षांची निवड करणे.
चर्चा:सदर विषयावर चर्चा करताना सचिव श्री. राहुल वाघमारे यांनी उपस्थित सभेस सांगितले कि, सभेकरिता अध्यक्ष नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याकरिता श्री सचिन दळवी यांनी आजच्या सभेचे अध्यक्ष स्थान भूषवावे अशी विनंती केली. त्यास श्री. दिपक कोळी यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे सर्वानुमते श्री सचिन दळवी यांची सभेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
ठराव क्र. १: ठराव करण्यात येत आहे कि, श्री सचिन दळवी यांना आजच्या सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे.
सूचक : श्री. राहुल वाघमारे
अनुमोदक : श्री. दिपक कोळी
ठराव सर्वानुमते मंजूर.
ठराव क्रमांक १ नुसार श्री सचिन दळवी सभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारल्या नंतर त्यांच्या अध्यक्षते खाली सभेचे कामकाज विषयपत्रिके नुसार सचिव श्री राहुल वाघमारे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सुरु केले. त्यानुसार सर्वप्रथम सोसायटीतील दिवंगत सदस्यांना सोसायटीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर सोसायटीच्या पुनर्विकास प्रकाल्पाकरिता नियुक्त करण्यात आलेले पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) श्री. लीलाधर परब आणिकायदेशीर सल्लागार श्री. अभिनय सिंगयांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विषय क्र. २ः मागील दि. ०१.०२.२०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारणसभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे.
चर्चा: दिनांक ०१.०२.२०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सचिव श्री राहुल वाघमारे यांनी उपस्थित सभेसमोर वाचून दाखवले. त्यातील संबंधित मुद्द्यांची माहिती सभासदांना विषद करण्यात आली. याबाबत कुणाचीही कोणतीही शंका अथवा आक्षेप नसल्याने सदर इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
ठराव क्र. २: ठराव करण्यात येतो की, आजची सभा दिनांक ०१.०२.२०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास मंजूरी देत आहे.
सूचक : श्री. प्रभाकर तावडे
अनुमोदक : श्री. प्रदीप महाडिक
ठराव सर्वानुमते मंजूर.
विषय क्र. ३ः प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (PMC) नियुक्तीनंतर त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावर/अहवालावर चर्चा करून निर्णय घेणे.
३-अ) प्रकल्प व्यवहार्यता अहवाल (Project Feasibility Report)
३-ब) प्रस्तावित युनिट आराखडा (Proposed Unit Plan)
३-क) मसुदा निविदा दस्तऐवज (Draft Tender Document) मंजूर करणे.
चर्चा:सदर विषयासंदर्भात सभेसमोर बोलताना सचिवश्री. राहुल वाघमारेयांनी सभेस माहिती दिली की, संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोसायटीच्या वतीने परिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती सभासदांना देण्यात आली होती. याबाबत कुणाच्या काही सूचना, सुधारणा अथवा हरकती असल्यास त्या लेखी स्वरुपात दिनांक 10-04-2026 पर्यंत सोसायटी कार्यालयात सादर कराव्यात असे कळविण्यात आले होते. आणि त्यासाठी सभासदांना पुरेसा वेळ देण्यात आला होता.
त्यानुसार श्री. रवींद्र कुकडे, श्री. विश्वनाथ सावंत, श्री. शैलेश करगुटकर, श्रीमती भोगटे, श्रीमती आशा नाईक, श्री. चौगुले, श्री. लिमये, श्री. जाधवआदींनी १) प्रकल्प व्यवहार्यता अहवाल (Project Feasibility Report), २) प्रस्तावित युनिट आराखडा (Proposed Unit Plan) आणि ३) मसुदा निविदा दस्तऐवज (Draft Tender Document) या अहवालांच्या छायाप्रती आकलनासाठी घेतल्या होत्या. त्यांच्यापैकी श्री. रवींद्र कुकडे व श्री विश्वनाथ सावंत व श्री. शैलेश करगुटकर यांनी त्यांच्या सूचना व आवश्यक सुधारणा लेखी स्वरूपात सोसायटीकडे सादर केल्या.
सदरचे अहवाल अत्यंत विस्तृत असून त्यामध्ये विविध बाबींवर सखोल सूचना व प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक ०९.०४.२०२६ रोजी सोसायटी कार्यालयात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार श्री. लीलाधर परब, कायदेशीर सल्लागारॲड. श्री. अभिनय सिंग तसेच सोसायटीचे पदाधिकारी व काही सभासद यांच्या उपस्थितीत सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुनर्विकासा संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले होते. सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करून, आवश्यक असणाऱ्या ग्राह्य बाबीसदर अहवालांमध्ये समाविष्ट करण्यास कायदेशीर सल्लागारॲड. श्री. अभिनय सिंगयांनी सहमती दर्शवली. पुनर्विकासाच्या दृष्टीने हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सभेतील वेळ वाया जाऊ नये म्हणून सदर विषयावर विस्तृत सखोल चर्चा सभासदांशी बैठकीपूर्वीच चर्चा करण्यात आली होती. सदर बैठक रात्री १२:०० वाजेपर्यंतचालली असून त्यानंतर आवश्यक सुधारणा या अहवालांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
त्यानंतर सोसायटीचे पीएमसी श्री लीलाधर परब आणि कायदेशीर सल्लागार श्री अभिनय सिंग यांनी विशेष सर्वसाधारण सभेसमोर फिजिबिलिटी रिपोर्ट, प्रस्तावित युनिट आराखडा आणि मसुदा निविदा दस्तावेज यांच्या अहवालांचे अनुक्रमे सादरीकरण करताना, पुनर्विकास प्रकल्पात सभासदांना मिळणारे चटई क्षेत्र, त्यातील समाविष्ट बाबी तसेच प्रस्तावित आराखड्याची सविस्तरपणे माहिती दिली. तसेच सुधारित मसुदा निविदा दस्तऐवज मधील महत्त्वाच्या अटी व शर्तीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री. सुनिल गुप्ता यांनी प्रस्तावित युनिट आराखड्यातील चटई क्षेत्र कमी असल्याबाबत मुद्दा उपस्थित करून त्याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्याची सूचना केली. त्यावर श्री. लीलाधर परब यांनी समाधानकारक खुलासा करताना फिजिबिलिटी रिपोर्ट व आराखड्याबाबत पुन्हा सविस्तर माहिती दिली. या खुलाश्याने श्री सुनिल गुप्ता यांचे समाधान झाले. तसेच सचिव श्री. राहुल वाघमारे यांनी अजुन काही सुचना प्रश्न असल्यास सभासदांनी सांगावे असे पुन्हा एकदा विचारले. अशा प्रकारे सविस्तर चर्चा झाल्यानंतर सचिव श्री. राहुल वाघमारे यांनी ३अ) प्रकल्प व्यवहार्यता अहवाल (Project Feasibility Report) आणि ३-ब) प्रस्तावित युनिट आराखडा (Proposed Unit Plan) आणि क) मसुदा निविदा दस्तऐवज (Draft Tender Document) ला मंजुरी देण्याबाबत सभेचे मत मागितले असता वरील तिन्ही विषयांना उपस्थित सभेने एकमताने सहमती दर्शवून मंजुरी दिली.
ठराव क्र. ३ अ ३ ब आणि ३-क): ठराव करण्यात येतो की, सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाकरिता पीएमसीकडून सादर करण्यात आलेला प्रकल्प व्यवहार्यता अहवाल (Project Feasibility Report) व प्रस्तावित युनिट आराखडा (Proposed Unit Plan), मसुदा निविदा दस्तऐवज (Draft Tender Document) यास आजची सभा आवश्यक असलेल्या प्राप्त सूचना व हरकती यांचा समावेश करून सुधारित स्वरूपात एकमताने मंजुरी देत आहे.
सूचक : श्री. दत्तात्रय राजदेव
अनुमोदक : श्री. दिपक पवार
ठराव सर्वानुमते मंजूर.
त्यानंतर सचिव श्री राहुल वाघमारे यांनी उपस्थित सभेसमोर खुलासा करताना सांगितले कि, मसुदा निविदा दस्तऐवज (Draft Tender Document) केवळ विकासकांकडून निविदा मागविण्यासाठी आहे. प्राप्त झालेल्या निविदांमधून विकासक नियुक्तीचा अंतिम निर्णय हा विशेष सर्वसाधारण सभा घेईल आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्यास सर्व उपस्थित सभेने बहुमताने मंजुरी दिली.
ठराव क्र.३ ड - ठराव करण्यात येत आहे कि, आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आलेला मसुदा निविदा दस्तऐवज (Draft Tender Document) केवळ विकासकांकडून निविदा मागविण्यापुरता मर्यादित आहे. विकास नियुक्तीचा सर्वाधिकार हा विशेष सर्वसाधारण सभेचा आहे.
सूचक: श्री. रवींद्र कुकडे
अनुमोदक : श्री. भाऊराव खानविलकर
ठराव सर्वानुमते मंजूर.
विषय क्र. ४: सोसायटीचा विमा (Insurance) काढणे.
चर्चा: मागील दिनांक ०१.०२.२०२६ रोजी झालेल्या सभेमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, सोसायटीसाठी विमा (Insurance) काढण्याबाबत विविध कंपन्यांकडून निविदा (Tender) मागविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सदर विषयावर कार्यवाही करण्यात आली असून, सोसायटीचा विमा काढण्या संबंधीचा प्रस्ताव सभेसमोर मांडण्यात आला. सदर विषयावर चर्चा करून तो सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असता, उपस्थित सर्व सभासदांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.
ठराव क्र. ४ : ठराव करण्यात येतो की, सोसायटीचा विमा (Insurance) काढण्यासाठी विविध विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या असून, प्राप्त निविदांचा विचार करून सोसायटीचा विमा काढण्यास सभेची मान्यता देण्यात येत आहे.
सूचक : श्री. प्रदिप म्हाडीक
अनुमोदक : श्री. दिपक कोळी
ठराव सर्वानुमते मंजूर.
प्रकल्प व्यव्यहार्यता अहवाल (Project Feasibility Report) प्रस्तावित युनिट आराखडा (Proposed Unit Plan) आणि मसुदा निविदा दस्तवेज (Draft Tender Document) बद्दल सुचना, प्रश्नाचे निरसन आणि अधिक माहिती स्पष्टीकरण सहित सोसायटी ऑफिस मध्ये बोलवून दिल्याबद्दल सभासदांनी सोसायटी कमीटीचे आभार मानले.
अश्या प्रकारे सर्व विषयांवर चर्चा होवून खेळी मेळीच्या वातावरणात सभेचे कामकाज पार पडले.
श्री. सचिन दळवी अध्यक्ष यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.
आपले नम्र,
सिध्दीविनायक को. ऑप. हौसींग सोसायटी